...पुढे मी गेलो !
हे रान जरी घनदाट...पुढे मी गेलो !
काढून स्वतःची वाट...पुढे मी गेलो !
पायात जरी दररोज निराळी बेडी...
सोडून मला मोकाट..पुढे मी गेलो !
चौफेर पहारे, गस्त नि नाकेबंदी....
त्यातूनच बिनबोभाट पुढे मी गेलो !
फिरणार तसा नव्हतोच कधी माघारी...
होऊन पुरी घबराट...पुढे मी गेलो !
आता न तुझ्या हातात मला थांबवणे
तू लाव कितीही नाट...पुढे मी गेलो !!
मंजूर मला नव्हतेच किनारा होणे...
होऊन तुफानी लाट...पुढे मी गेलो !
कल्लोळ नको, आकांत नको मज माझा...
सोडून इथे गोंगाट...पुढे मी गेलो !
क्षण चार विसावा गार मिळाला नाही...
नव्हताच नदीला घाट...पुढे मी गेलो !
आरास खुणावत होती मज काट्यांची
टाळून फुलांचा थाट...पुढे मी गेलो !
वगळून मला केलीस तुझी तू यादी...
मारून तुझ्यावर काट...पुढे मी गेलो !!
- प्रदीप कुलकर्णी
No comments:
Post a Comment