तुझी काहीच खबर नाही...आहेस कुठे तू ?
तुझे ठावे न कुशल काही...आहेस कुठे तू ?
किती मी जाचक मज झालो...ये मुक्त कराया...
किती हा धाक... दडपशाही...आहेस कुठे तू ?
कुठेही जीव रमत नाही...मी काय करावे ?
तुला जाणीव नच जराही...आहेस कुठे तू ?
किती मी आत जळत राहू...? बाहेर उन्हाळा...!
कशी लाहीत परत लाही...आहेस कुठे तू ?
असा बंदिस्त, कळत नाही, झालास कसा तू ?
दिशांचा प्रश्न सतत दाही...`आहेस कुठे तू ?`
तुझा शोधून मिळत नाही का ठावठिकाणा ?
कशी माझीच विवशता ही...आहेस कुठे तू ?
`तुला सोडून परत नाही जाणार कुठे मी`
- मला दे हीच परत ग्वाही...! आहेस कुठे तू ?
तुझ्यावाचून तरल व्हावे आयुष्य कसे हे...?
पुन्हा ये... जन्म कर प्रवाही...आहेस कुठे तू ?
कुठे आहेस ? कणव नाही काहीच तुला का...?
अता ये धावत लवलाही...आहेस कुठे तू ?
- प्रदीप कुलकर्णी
No comments:
Post a Comment