एवढी कशाला घाई...थांब की जरा !
मज खुणावते केव्हाची तेथली जुई...
येथली म्हणे ही जाई...`थांब की जरा` !
मी पुढे पुढे जाण्याचे योजतो जरी...
सांगते मला सटवाई...थांब की जरा !
राहशील मागे आता तू तरी कसा...?
द्यायची तुला भरपाई...थांब की जरा !
वेदना, व्यथा, दुःखेही पोतडीत या...
पाहण्यास ही नवलाई...थांब की जरा !
ध्यास तू पुरेसा माझा घेतलास का ?
मी दिसेन ठाई ठाई...थांब की जरा !
कोणते खरे अन् खोटे कोणते बरे...?
जाणशील तू सच्चाई...थांब की जरा !
का उगाच डोळे आधी लागले मिटू...?
संपली कुठे अंगाई...थांब की जरा !!
सोडतोस का रे बाबा धीर तू असा...?
व्हायची उद्या स्वस्ताई...थांब की जरा !
ऐक वा नको ऐकू तू अंतरा कधी...
ऐक ऐक ही अस्ताई...थांब की जरा !
हो, तुलाच देतो गाणे वाचण्यास मी...
वाळली कुठे ही शाई...थांब की जरा !
ऐकलेच नाही माझे शेवटी तिने....
मी म्हणूनसुद्धा- `आई, थांब की जरा` !
- प्रदीप कुलकर्णी
No comments:
Post a Comment