माझी भूमिका, माझा लढा!

ब्लोग वर शोधा

मातृवंदना

मातृवंदना

दिला जन्म तू,विश्व हे दाविलेस
किती कष्ट माये,सुखे साहिलेस,
जिण्यालागि आकार माझ्या दिलास
तुझ्या वंदितो माउली,पाउलांस

गुरु आद्य तू,माझिया जीवनात
तुवा पेरिली धर्मबीजे मनात,
प्रपंचात सत्पंथ तू दाविलास
तुझ्या वंदितो माउली,पाउलांस

तुझा कीर्तिविस्तार माझा प्रपंच
कृपेने तुझ्या रंगला रंगमंच,
वठे भूमिका पाठ जैसा दिलास
तुझ्या वंदितो माउली,पाउलांस

तुझे थोर संस्कार आचार झाले
तुझे यत्नप्रामाण्य सिध्दीस गेले,
तुझ्या चिंतने,लोभ पावे निरास
तुझ्या वंदितो माउली,पाउलांस

उमेचे,रमेचे,तसे शारदेचे
जपध्यान तैसे तुझे जन्मदेचे,
तुझ्या प्रेरणेने यशस्वी प्रवास
तुझ्या वंदितो माउली,पाउलांस

महाकवी ग.दि.माडगूळकर
(पूरिया संग्रहातून साभार)

No comments:

Post a Comment

 

ब्लॉग वर आल्याबद्दल आम्ही मनपूर्वक आभारी आहोत...!!

******सुधिर गोसावी******

ग्रेट मराठी कविता... ब्लोग वर प्रकाशित झालेली प्रतेक कविता आणि मराठी साहित्य हे मी लिहिलेले नाही. मी सुधिर गोसावी, ग्रेट मराठी कविता...मराठी मनाचा वेध घेण्यासाठी चालु केलेला एक प्रवास !! ब्लोगवर मराठी कवितेचे व साहित्याचे फक्त संग्रहण करतो, अधिकार गाजवत नाही.