स्वप्नील डोळ्यांची उघडझाप करीत
जेव्हा तू बोलायचीस माझ्याशी
कान माझे चक्क फ़ितुरी करायचे
मात्र डोळे होते प्रामाणिक माझ्याशी
अखंड उत्साही बडबड तुझी
कानावरुन जायची वाहून
पण निरागस आविर्भाव चेहेऱ्यावरचा
न्यायचा माझं मी पण पळवून
"असा काय रे बघतोस हरवल्यासारखा",
तू म्हणायचीस नेहेमी
"अगं, मलाच शोधतोय तुझ्या डोळ्यात
सारखा हरवतो माझा मी"
"तुझं आपलं काहीतरीच"!
तू टिंगल करायचीस माझी
पण ते लाजरं खळीतलं हसू तुझं
खरं खरं बोलायचं माझ्याशी
सूर्याचं अस्ताला घाईघाईनं जाणं
अन् तुझं ते गडबडीनं उठणं
रेंगाळलेली किरणं गोळा करत
माझं उद्याची वाट पहाणं....!
"येते रे", म्हणतानाची तुझी व्याकुळ नजर
ओढाळ पावलं अन् ओली पापण्यांची झालर
पाठमोरी डोळ्यात साठवलेली तू
अन् अजूनही हरवलेला मी
अन् अजूनही हरवलेला मी.......!
No comments:
Post a Comment