विस्तवाचे दान कवितेने दिले !
चांदणेही छान कवितेने दिले !
जन्म हा निष्पर्ण झाडासारखा...
एक हिरवे पान कवितेने दिले !
व्यक्त हो चौफेर, डेरेदार तू...
मोकळे हे रान कवितेने दिले !
त्याच त्या गोष्टी जुन्या विसरून जा...
हे नवे आव्हान कवितेने दिले !
वेदना, दुःखे, व्यथा अन् आसवे...
तेच ते सामान कवितेने दिले !
जी नको ती जाण कवितेने दिली...
जे नको ते ज्ञान कवितेने दिले !
मान्य, मी ओसाड वाड्यासारखा...
हे जिणे सुनसान कवितेने दिले !
व्यर्थ ताळेबंद हा ठेवू नये...
मान की अपमान कवितेने दिले !
या तुम्हीही...एकटा घेऊ कसा...?
- जे मला रसपान कवितेने दिले !
या जगी कोण्या कवीला का कधी -
वास्तवाचे भान कवितेने दिले... ?
मौनही येते मला ऐकू तुझे...
मज अनोखे कान कवितेने दिले !
लाभले निर्भेळ काहीही कुठे...?
जे दिले दरम्यान कवितेने दिले !!
कोण मी होतो असा...माझ्याकडे -
एवढे का ध्यान कवितेने दिले ?
- प्रदीप कुलकर्णी
No comments:
Post a Comment