माझी भूमिका, माझा लढा!

ब्लोग वर शोधा

...का दिसेनात आता कुठे ?

ओळखीचे जुने चेहरे का दिसेनात आता कुठे ?
आपल्या माणसांची घरे का दिसेनात आता कुठे ?


सांग, झाली कधीपासुनी ही सुखासीन कांती तुझी ?
सांग ना... बोचकारे, चरे का दिसेनात आता कुठे ?


भेटलो, बोललो, हासलो काल मी ज्या सुखांच्या सवे...
...काय झाले असावे बरे ? का दिसेनात आता कुठे ?


मीच झालो कशाला इथे एकटा कावरा-बावरा ?
सोबती कावरे-बावरे का दिसेनात आता कुठे ?


कोरडे कोरडे हे जिणे वाहता वाहता थांबते -
- आणि पुसते मला ,`ते झरे का दिसेनात आता कुठे ?`


एकही पान ज्यांच्याविना त्या तरूचे न हलले कधी...
तीच त्याची पिले-पाखरे का दिसेनात आता कुठे ?


आज संबंध माझे-तुझे जीर्ण पत्राप्रमाणेच ना ?
जी हवी ती मला अक्षरे का दिसेनात आता कुठे ?


बोलणे, ऐकणे, पाहणे यास धरबंद नाही अता...
संयमी ती तिन्ही वानरे का दिसेनात आता कुठे ?


हाल झाले कुणाचे कसे... त्रास झाला कुणाला किती...
ते बिचारे सगे-सोयरे का दिसेनात आता कुठे ?


सांग, घेऊ कुठे आसरा ? सांग, आता कुठे मी दडू...?
जीवना रे, तुझे कोपरे का दिसेनात आता कुठे ?


शोधिली मी किती मंदिरी, शोधिली मी उरी-अंतरी...
बा, विठोबा, तुझी लेकरे का दिसेनात आता कुठे ?


- प्रदीप कुलकर्णी

No comments:

Post a Comment

 

ब्लॉग वर आल्याबद्दल आम्ही मनपूर्वक आभारी आहोत...!!

******सुधिर गोसावी******

ग्रेट मराठी कविता... ब्लोग वर प्रकाशित झालेली प्रतेक कविता आणि मराठी साहित्य हे मी लिहिलेले नाही. मी सुधिर गोसावी, ग्रेट मराठी कविता...मराठी मनाचा वेध घेण्यासाठी चालु केलेला एक प्रवास !! ब्लोगवर मराठी कवितेचे व साहित्याचे फक्त संग्रहण करतो, अधिकार गाजवत नाही.