माझी भूमिका, माझा लढा!

ब्लोग वर शोधा

काही दशके त्याचे.... पाल्हाळ कशासाठी

हा जन्म कशासाठी हा काळ कशासाठी
अप्राप्य क्षितीजांचे आभाळ कशासाठी

तात्पर्य कथेचे ज्या बदले न कधी मृत्यो
काही दशके त्याचे पाल्हाळ कशासाठी

काढू सण एखादा ज्याला न 'उद्या' आहे
हे ईद दिवाळी वा नाताळ कशासाठी

पंखात बळे येता आकाश पुढे जाते
करतोस स्वतःला तू घायाळ कशासाठी

दुनियेत तुझ्या सध्या मीही जगतो आहे
बनतेस तुझ्यापुरती वेल्हाळ कशासाठी

अवतार तुझा हल्ली डरपोक मला वाटे
खांबातच लपण्याला आयाळ कशासाठी

आतून स्वतःला मी जाणून पुरा आहे
बाहेरच प्रतिमेचा सांभाळ कशासाठी

अवघड नव्हते देवा काहीच तुझ्यासाठी
दुष्काळ कशासाठी.... आबाळ कशासाठी

अपुले अपुले जगणे अपुले अपुले जाणे
देहास मनाची मग ही नाळ कशासाठी

आगीस कधी कोणी लावेल कशा आगी
कोणास विचारावे हा जाळ कशासाठी

No comments:

Post a Comment

 

ब्लॉग वर आल्याबद्दल आम्ही मनपूर्वक आभारी आहोत...!!

******सुधिर गोसावी******

ग्रेट मराठी कविता... ब्लोग वर प्रकाशित झालेली प्रतेक कविता आणि मराठी साहित्य हे मी लिहिलेले नाही. मी सुधिर गोसावी, ग्रेट मराठी कविता...मराठी मनाचा वेध घेण्यासाठी चालु केलेला एक प्रवास !! ब्लोगवर मराठी कवितेचे व साहित्याचे फक्त संग्रहण करतो, अधिकार गाजवत नाही.