चिडून बोलायचे उगाच काहीतरी
मनात ठेवायचे उगाच काहीतरी
नको तपासू मला, नको परीक्षा तुझी
निकाल लागायचे उगाच काहीतरी
उनाड कोणीतरी ढगात रेखाटते
बघून टाकायचे उगाच काहीतरी
तुझे जुने खेळणे जपून खेळायचे...
फिरून मोडायचे उगाच काहीतरी!
नवीन खाणाखुणा, नवीन नियमावली
कयास लावायचे उगाच काहीतरी
घरास परवानगी जमीन नाकारते
हवेत बांधायचे उगाच काहीतरी
तुफान ओठातले उरात कोंडायचे...
कशास बोलायचे उगाच काहीतरी?
उदास गर्दी नको, वरात रडती नको
अखेर जाळायचे उगाच काहीतरी!
आपला नम्र,
अलखनिरंजन
No comments:
Post a Comment