तू मनापासून कर मज याद...मी आहे तिथे !
घाल केव्हाही मला तू साद...मी आहे तिथे !
नेहमीसाठीच केला वर्ज्य मी तो उंबरा...
हा नको माझ्यावरी अपवाद...'मी आहे तिथे !'
टाळण्य़ाजोगा न मी...भेटा; नका भेटू मला...
मी किती वाटो कुणाला ब्याद....मी आहे तिथे !
आपल्यासाठी कशाला अंतरांची कौतुके ?
साध तू तेथूनही संवाद...मी आहे तिथे !
छेड एकांतात तारा काळजाच्या, तू तुझ्या...
ऐक तू ! येईल माझा नाद !! मी आहे तिथे !
धीर त्यांना द्यायला...त्यांना उभारी द्यायला...
- माणसे सारी जिथे बरबाद...मी आहे तिथे !
का तुला शंका ? तुझ्या मी अंतरी आहेच ना !
घालशी का तू तुझ्याशी वाद ? मी आहे तिथे !
- प्रदीप कुलकर्णी
No comments:
Post a Comment