माझी भूमिका, माझा लढा!

ब्लोग वर शोधा

...सारेच विसरू दे मला !

..सारेच विसरू दे मला !

बडवे, विठोबा, पंढरी...सारेच विसरू दे मला !
तेथे न माझी पायरी... ! सारेच विसरू दे मला !

काही तरी झंकारले...कोणी तरी हुंकारले...
आता सुनेपण अंतरी...सारेच विसरू दे मला !

ती रातराणी, चांदवा... गंधाळलेला गारवा...
ती पौर्णिमा जादूभरी...सारेच विसरू दे मला !

ऱडलीस तू माझ्यासवे...पुसलीस माझी आसवे...
ती सांत्वना अन् त्या सरी...सारेच विसरू दे मला...!

खचलो नकाराने तुझ्या...पिचलो विचाराने तुझ्या...
झाली जिण्याची मस्करी...सारेच विसरू दे मला !

स्वप्ने तुझी मी पाहिली...सारीच अर्धी राहिली...
ते शल्य, कळ ती बोचरी...सारेच विसरू दे मला !

माझी सखी, अभिसारिका...गेली कुठे ती राधिका ?
गेली कुठे ती बासरी...सारेच विसरू दे मला !

पोटास या कोंडा मिळो...झोपायला धोंडा मिळो...
कविता, कथा, कादंबरी...सारेच विसरू दे मला !

मज भोवती नाही कुणी, मज सोबती नाही कुणी...
नाही कुणी माझ्या घरी....सारेच विसरू दे मला !

वाऱ्यासवे मी भांडतो, छळ मी जगाचा मांडतो !
हे आळ जे माझ्यावरी...सारेच विसरू दे मला !

केला कुणी उपहासही...म्हटले कुणी `शाबास`ही...
निंदा-स्तुती खोटी-खरी...सारेच विसरू दे मला !

शहरात या उपऱ्यापरी...! माझ्यात मी दुसऱ्यापरी...!!
ते गाव...घर, ती ओसरी...सारेच विसरू दे मला !

आता मला सुटका हवी...मज पाहिजे दुनिया नवी...
आता तरी, आता तरी... सारेच विसरू दे मला !

करणार मी हाही गुन्हा....स्मरणार मी सारे पुन्हा...!
काही क्षणांसाठी परी....सारेच विसरू दे मला !!

- प्रदीप कुलकर्णी

No comments:

Post a Comment

 

ब्लॉग वर आल्याबद्दल आम्ही मनपूर्वक आभारी आहोत...!!

******सुधिर गोसावी******

ग्रेट मराठी कविता... ब्लोग वर प्रकाशित झालेली प्रतेक कविता आणि मराठी साहित्य हे मी लिहिलेले नाही. मी सुधिर गोसावी, ग्रेट मराठी कविता...मराठी मनाचा वेध घेण्यासाठी चालु केलेला एक प्रवास !! ब्लोगवर मराठी कवितेचे व साहित्याचे फक्त संग्रहण करतो, अधिकार गाजवत नाही.