माझी भूमिका, माझा लढा!

ब्लोग वर शोधा

व्यासही माझ्यात...मी व्यासात आहे...!

मान माझी कोणत्या फासात आहे ?
अंत माझा कोणत्या श्वासात आहे ?

यामुळे मैत्री तुझी-माझी न रंगे
संशयाचा रंग विश्वासात आहे !

व्यर्थ कांगावा कशासाठी करू मी ?
मीच कोठे एकटा त्रासात आहे ?

हा रिता माझा...तुझा ओसंडलेला...
काय ही जादू तुझ्या ग्लासात आहे ?

जी तुझ्या भेटीतही नाही खुमारी...
ती नशा, धुंदी तुझ्या भासात आहे !

नोंद माझी घेतली नाही कुणीही...
नोंद माझी हीच इतिहासात आहे !

ये, तुझ्या श्वासात घे मिसळून थोडे...
चांदणे माझ्याच निःश्वासात आहे !

आयता बसशील आयुष्या किती तू ?
ऊठ आता, मौज सायासात आहे !

खैर नाही आज कुठल्याही सुखाची...
आज माझे दुःख उल्हासात आहे !

ये पुन्हा मागे मला वाचायला तू...
(वाच आता नीट...मी कंसात आहे !!)

भेटलो कित्येक दिवसांनी मला मी...
आज मी माझ्याच सहवासात आहे !!

राम नाही राहिला माझ्यात आता...
मी कधीपासून वनवासात आहे !

काव्य दोघांना सुचावे...नवल नाही...!
व्यासही माझ्यात...मी व्यासात आहे !!


- प्रदीप कुलकर्णी

No comments:

Post a Comment

 

ब्लॉग वर आल्याबद्दल आम्ही मनपूर्वक आभारी आहोत...!!

******सुधिर गोसावी******

ग्रेट मराठी कविता... ब्लोग वर प्रकाशित झालेली प्रतेक कविता आणि मराठी साहित्य हे मी लिहिलेले नाही. मी सुधिर गोसावी, ग्रेट मराठी कविता...मराठी मनाचा वेध घेण्यासाठी चालु केलेला एक प्रवास !! ब्लोगवर मराठी कवितेचे व साहित्याचे फक्त संग्रहण करतो, अधिकार गाजवत नाही.