माझी भूमिका, माझा लढा!

ब्लोग वर शोधा

राहिलो एकेकटे दोघे जगत....!

हुरहुरत तूही नि मीही तगमगत...!
राहिलो एकेकटे दोघे जगत...!


जागवत बसलो स्वतःला व्यर्थ मी
मीच माझे ऐकले नाही स्वगत...!


गंध उडतो; रंगही पडतो फिका...
शेवटी सार्‍या फुलांची हीच गत...!!


आणखी, माझ्या जवळ ये, आणखी...
तू जरी आहेस ह्रदयाच्या लगत...!


कोळसा समजून ज्याला फेकले
दूर तेथे राहिला तो झगझगत...!


मी विचारू कोणत्या झाडास हे -
`रोपटे माझेच का नाही तगत...?`


मी दिले सोडून स्वप्ने पाहणे...
आस मी कुठलीच नाही बाळगत...!


संकटांनो, वादळांनो या तुम्ही -
- या तुम्ही...! नाही अता मी डगमगत...!


संपली राज्ये नि साम्राज्ये किती...
हीच बाबा, हीच आहे, कालगत...!


शांत बाहेरून मी वाटे जरी...
नेहमी आतून असतो धगधगत...!


चीज मी चोरीस गेलेली जणू...!
मज कुणी केलेच नाही हस्तगत...!!


- प्रदीप कुलकर्णी

No comments:

Post a Comment

 

ब्लॉग वर आल्याबद्दल आम्ही मनपूर्वक आभारी आहोत...!!

******सुधिर गोसावी******

ग्रेट मराठी कविता... ब्लोग वर प्रकाशित झालेली प्रतेक कविता आणि मराठी साहित्य हे मी लिहिलेले नाही. मी सुधिर गोसावी, ग्रेट मराठी कविता...मराठी मनाचा वेध घेण्यासाठी चालु केलेला एक प्रवास !! ब्लोगवर मराठी कवितेचे व साहित्याचे फक्त संग्रहण करतो, अधिकार गाजवत नाही.