जगावे कशाला, मला वेळ नाही
पुरे खेळ झाला, मला वेळ नाही
कपाटे स्मृतींची कधी आवरू मी?
किती वेळ झाला मला वेळ नाही
पुन्हा का हरावे? पुन्हा का रडावे?
तिच्या सांत्वनाला मला वेळ नाही
इशार्यात एका किती बारकावे
पुरे वाचण्याला मला वेळ नाही
घड्याळास जाई झुगारून काटा
म्हणे, "धावण्याला मला वेळ नाही!"
तुला काय वाटे, कसे ओळखू मी?
धुके पिंजण्याला मला वेळ नाही
निखारे विझाले, कुणी पेटवावे?
तिचा धीर गेला, मला वेळ नाही...
पुन्हा मांडले मी जुने मागणे अन्
पुन्हा तो म्हणाला, "मला वेळ नाही"
जगी काम मोठे असे काय आहे?
कशाला म्हणावे मला वेळ नाही?
नवे दु:ख माझे मला सावरू दे
ऋणे फेडण्याला मला वेळ नाही
जरा बोलकी हो, जरा सांग "नाही"
पुन्हा जागण्याला मला वेळ नाही
फुले पाहण्याची किती राहिलेली!
तुझ्या दर्शनाला मला वेळ नाही
खुळा काळ दारी पुन्हा थांबलेला
जरा सांग त्याला, मला वेळ नाही
साभार,
अलखनिरंजन
No comments:
Post a Comment