बंद घे करून दार...चाललो निघून मी
पावले न थांबणार..चाललो निघून मी
सारखा कसा फसेन हासण्यास त्या तुझ्या ?
मी बये तसा हुषार..चाललो निघून मी
हा तुझ्यामुळेच घोळ, तूच निस्तरून जा
फक्त तू जबाबदार --- चाललो निघून मी
राहिलीस तू अजिंक्य एवढे करुनही
चल, मला कबूल हार..चाललो निघून मी
मी पुन्हा न भेटणार, परतणारही न मी
फैसला न बदलणार..चाललो निघून मी
द्यायचा कसा निरोप आज सांगतो तुला
हास फक्त एकवार.......चाललो निघून मी
येथल्या फुलांमधे न गंध, रंग राहिले
शोधण्या नवी बहार..चाललो निघून मी
No comments:
Post a Comment