मज नको नको झाला शब्दच्छल... कोठे जाऊ ?
अर्थ शोधतो मी माझा चपखल...कोठे जाऊ ?
नेमके कुणाचे ऐकावे, समजेना काही...
मज दिशा दहाही म्हणती `चल, चल...`कोठे जाऊ ?
चेहरे नवे हे...नाही ओळख कोणाशीही...
राहिली न ती तेव्हाची मैफल...कोठे जाऊ ?
आठवे न काही केल्या वळण मलाही माझे...
मी उभाच एका जागी हतबल...कोठे जाऊ ?
आटपून आटोपेना...आग कशी अश्रूंची...
आवरू कसा मी हा वडवानल...कोठे जाऊ ?
जायचे मलाही येथून परत त्या काठाला...
ऐकतो, अता तेथेही दलदल...कोठे जाऊ ?
टोकदार काटे येथे...धगधग ज्वाळा तेथे...
घेउनी फुले मी माझी कोमल...कोठे जाऊ ?
ऐकवे न एकांता, आकांत तुझा एकाकी...
सोसवे न मौनाचा कोलाहल...कोठे जाऊ ?
एकटाच मी कोठे...? आहे कविता सांगाती...
भोवती खुळ्या शब्दांची दंगल...कोठे जाऊ ?
शेवटी उतारा आहे वत्सल त्या मृत्यूचा...
मज पचे न जन्माचे हालाहल...कोठे जाऊ?
- प्रदीप कुलकर्णी
No comments:
Post a Comment