काढू तुझा कशास माग...? काय फायदा ?
सारा वृथाच पाठलाग...काय फायदा ?
तुज आठवून चांदणे मिळेल का कधी...?
मिळणार फक्त आग आग...काय फायदा ?
गेले घडायचे घडून....जे घडायचे...
कोणावरी धरून राग...काय फायदा ?
स्वार्थी सवाल हाच सारखा मला छळे -
`केलास तू कशास त्याग...? काय फायदा ?`
लागायचा कलंक, लागलाच शेवटी...
आता धुऊन डाग डाग...काय फायदा ?
जमवून ठेवलेत फक्त शून्य शून्य तू...
गुणलेस वा दिलास भाग...काय फायदा ?
तू रक्त शिंपलेस, शिंपशीलही उद्या...
गेल्यावरी जळून बाग...काय फायदा ?
होतात ओळखी नवीन, लाभ हा जरी -
झालो मलाच मी महाग...काय फायदा ?
वागायचा तसाच वागतोस तू मना...
सांगून रोज , `नीट वाग...` काय फायदा ?
दोहा निदान एक पाहिजे सुचायला...
नुसता मिळून हातमाग...काय फायदा ?
डोळे मिटायचीच वेळ येत चालली...
येऊन शेवटास जाग...काय फायदा ?
- प्रदीप कुलकर्णी
No comments:
Post a Comment