बुडशील तू; तेव्हाच ना तरशील तू ?
कोठून तारे-तारका आणायच्या...?
माझ्यापुढे आकाश अंथरशील तू !
सलते कुठे निरखून घे आधी जरा...
भलतीकडे नुसतेच टोकरशील तू !
पाण्याप्रमाणे वाहती दुःखे तुझी...
डोळे स्वतःसाठी किती भरशील तू ?
हाती तुझ्या आले न काही शेवटी...
माझा कशाला हात मग धरशील तू ?
माझ्याविना आहे तुला कुठली दिशा ?
माझ्यासवे, माझ्यात वावरशील तू !
चिंधी मला शापून गेली फाटकी...
आयुष्यभर वाराच पांघरशील तू !
जन्मून कायेचा मिळाला फायदा...
पण शेवटी छायेविना मरशील तू !
जाशील मज विसरून तू, हेही खरे...
...हेही खरे, मज सारखी स्मरशील तू !
- प्रदीप कुलकर्णी
No comments:
Post a Comment