कधी...
कुणी आमिषे दाखवली तर कुणी पाडली भूल कधी !
कुणी सारखे नागवले मज... दिली शेवटी हूल कधी !
कधी गाव हे आवडले तर कधी भावली ती वसती...
इथे टाकले अंग कधी तर तिथे मांडली चूल कधी !
तुझी ही अशी मान हले; मग तसा त्यावरी जीव झुले...
कधी मोरणी `होय` म्हणे तर `नको` सांगतो डूल कधी !
किती घासल्या रोज मनावर तुझ्या सारख्या आठवणी....
कुठे पेटला सांग तरी पण जिण्याचा पुन्हा गूल कधी ?
मनासारखी सोबत-संगत मिळे नेहमी काय कुणा ?
कधी लाभते फूल सुवासिक, सले अंतरी शूल कधी !
तुझी सोडली आस तरी पण तुझी संपते ओढ कुठे.. .?
तुझे सारखे भास कधी तर तुझी फक्त चाहूल कधी !
दरी सांधली ही न कुणी, मग दुरावेच आले नशिबी....
कुठे अंतरे ही मिटली ...? नच कुणी बांधला पूल कधी !
सुगंधातही जे न कमी, वर दिसे रंगही रोज नवा....!
कुणी आणले काय कुणास्तव असे वेगळे फूल कधी ?
अता वाटते... बालपणातच खरी मौज होती दडली...
परी खंत... झालोच न आपण मुलासारखे मूल कधी !!
तुका तोच तू...होय, बरोबर पटे खूण ही आज मला...
अणूहून तू सूक्ष्म कधी तर नभाएवढा स्थूल कधी !
अता मान ही डोलवण्याविण मला काम नाहीच दुजे...
पडे प्रश्न...पाठीवरती पण कुणी टाकली झूल ? कधी ?
- प्रदीप कुलकर्णी
No comments:
Post a Comment