...काळजी नको !
कोण काय ओरडेल...काळजी नको !
जे घडेल, ते घडेल...काळजी नको !
चार आसवे निदान लाभतील ना...?
कोण शेवटी रडेल...काळजी नको !
प्राण द्यायला तयार सोबती किती...
जीव कोण पाखडेल...काळजी नको !
वाग तू मना तुला जसा हवा तसा...
ते कुणास आवडेल...काळजी नको !
मेघ आज कोरडाच, मात्र तो उद्या -
- चार थेंब शिंपडेल...काळजी नको !
रागही यथावकाश मावळेल हा...
प्रेमही पुन्हा जडेल...काळजी नको !
तू तुझा स्वभाव ठेव मोकळा, खुला...
कोण केवढे अडेल...काळजी नको !
हा वसंत, ही बहार बेगडी किती...
पान पान हे झडेल...काळजी नको !
राहिलीच काळरात्र ही अशी किती ?
चांदणे पुन्हा पडेल...काळजी नको !
काढले मनास आज आवरायला...!
काय काय सापडेल...काळजी नको !
काळजी करायची तरी किती किती...?
काळजी तुला नडेल ! काळजी नको !!
- प्रदीप कुलकर्णी
No comments:
Post a Comment