सांग जगू की सांग मरू मी...काय करू मी ?
काय करू मी...काय करू मी...काय करू मी ?
एकच सांगावेस कराया...शक्य मला जे -
बोल, स्मरू की तुज विसरू मी... काय करू मी ?
झेप कशी घेऊ...? गगनाची सक्त मनाई... !
पंख अता कोठे पसरू मी...काय करू मी ?
का जम कोठेही न बसे...बस्तान बसेना...
कायमचा का होतकरू मी...काय करू मी ?
स्वप्न कितीदा तेच बघू मी रोज नव्याने ?
रंग कितीदा तेच भरू मी...काय करू मी ?
सोबत घेऊ आज कुणाला....दूरच सारे...
हात कुणाचा सांग धरू मी...काय करू मी ?
गाव कसा... येथे घर नाही वा पडवीही...
हे न कळे कोठे उतरू मी...काय करू मी ?
रोज खुणावे एक अनोखी वाट परंतू...
- थांबवलेला वाटसरू मी...काय करू मी ?
आवड आहे काय तुझी ते सांग मला तू...!
पूर बनू की संथ झरू मी...काय करू मी ?
मान्यच आहे, आजवरी होतो वठलेला...
काय नको आता बहरू मी...काय करू मी ?
- प्रदीप कुलकर्णी
No comments:
Post a Comment